Sunday, May 31, 2015

क्षणोक्षण...!!!

   प्रत्येकाची आपली आपली एक गोष्ट असते... क्षणाक्षणांनी बनलेली...
   एक क्षण... हसण्याचा... रडण्याचा...थबकण्याचा... कोसळण्याचा आणि सावरण्याचाही...
विचारांची आवर्त गरगरा फिरत राहतात आपल्याभोवती... त्या क्षणांसारखीच...घड्याळाच्या काट्याबरोबर प्रत्येक क्षण निघून जातो.. तसा नित्य नवा उगवतोही... एकाने दुस-याला खो द्यावा तसा... उर्जस्वल... स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य असलेला... त्याच्या पोटातलं गुपित त्याला सामोरं जातानाच कळतं...
   कसा आहे हा क्षण...? आनंदाचा.. दुःखाचा.. उत्साहाचा.. आश्चर्याचा.. अगतिकतेचा की... काहीच न वाटण्याचा...? काही क्षण थबकवतात, विचार करायला भाग पाडतात... तर काही आतलं काहीसं तोडून मोकळं करतात आपल्यालाच...
असेच छोटे छोटे क्षण विणत गेले की आपली आपली एक गोष्ट तयार होते. मात्र त्यासाठी समोर येणारा प्रत्येक क्षण कवेत घेता यायला हवा. जसा आहे तसा... आरसपानी नजरेने तो न्याहाळण्याची ताकद यायला हवी..
   आपली tendency पण अशी असते की आपण आनंदी क्षण अगदी स्वतःहून कवेत घेतो... पण एखादा अगतिकतेचा.. हलवून टाकणारा, तीव्र दुःखाचा क्षण आला की मात्र पाठ फिरवतो त्याकडे...
एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण... जुनी ठुसठुसणारी जखम.. एकटेपणाची जाणीव किंवा अगदी सगळं आलबेल असतानाही...लागणारी टोचणी...
   असा क्षणच ओळखता यायला हवा...त्याला आपल्यावर मात करू देण्यापेक्षा त्याच्याकडे साक्षी भावाने पाहता आलं की.. जिंकलं...
   असे क्षणच स्थिरता शिकवतात... पुढच्या क्षणाकडे उत्सुकतेने पाहायला लावतात...
या समोर येणा-या प्रत्येक क्षणाचा आदर करायला शिकलं की मग आपलीही गोष्ट आनंदी वळणं घ्यायला लागते...

   आणि येणारा पुढचा क्षणही हसरा होऊन आपलं स्वागत करतो...!!! J J

Monday, August 19, 2013

एक शून्य मी.... ते ‘मी’…!!


    अमृता सुभाषचा त्या दिवशीचा लेख वाचला आणि ब-याच काळाने खरोखर काहीतरी व्यक्त करावंसं वाटलं. आपणच आपल्याला आतल्या आत कोसत राहण्याची, स्वतःलाच विनाकारण कमी लेखण्याची जी चूक करत राहतो त्याबद्दल... आताशा तर हे सगळं आपल्या इतकं अंगवळणी पडलंय की आपल्याला त्यात काही चूक आहे असं वाटतंच नाही. किंबहुना असं काही आपण करतोय याची जाणीव तरी कुठे असते आपल्याला...

   
     आपल्या प्रत्येकाच्या मनात स्वतःची एक प्रतिमा असते. मला त्या...स्थानावर जाऊन पोहोचायचंय, स्वतःच्या नजरेत स्वतःचीच एक जागा तयार करायचीए... हे सगळं मनोमन ठरवून आपण सुरूवात करतो खरी. पण अपेक्षेपेक्षा अनेक अनपेक्षित गोष्टी समोर येतात...आणि तिथूनच पडण्याचा, धडपडण्याचा, प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्यासाठी अनुभवाची किंमत चुकती करण्याचा काळ सुरु होतो.
  
    ठरवलेल्या स्थानावर जाऊन पोहोचण्याची आपल्याला इतकी घाई असते की त्यासाठी लागणारा वेळही द्यायला आपण तयार नसतो. आणि तिथूनच सुरुवात होते स्वतःबद्दलच्या अपेक्षाभंगाची आणि वर म्हटलं तसं, स्वतःच स्वतःला कोसत राहण्याची... पण यातून आपण एक पाऊल पुढे टाकण्यापेक्षा आणखीन चार पावलं मागेच येत असतो हे कुठे माहित असतं आपल्याला... आपण कोणीच नाही... आपण काही करूच शकणार नाही असं वाटण्याचा हाच तो काळ... या काळात आपण आपल्याशीच कसे वागतो यावरच आपलं पुढचं सगळं अवलंबून असतं. Self Motivation या संकल्पनेचा ज्याला कोणाला शोध लागला असेल तो त्याच्या याच काळात असावा कदाचित... संकल्पना एकंदरीत भारदस्त वाटत असली तरी त्यामागचं सूत्र साधं सोपं ए... To help yourself… That’s it… एका वाक्यात संपेल इतकं साधं...अर्थात ही सगळी पोपटपंची फक्त कळण्यासाठी... हे सगळं वळवून घेण्यासाठी लागणारे कष्ट ज्याचा तोच जाणे...
  
     या काळाला सामोरं जाणा-या मनांचा अभ्यास मानसशास्त्रज्ञांनी केलाय का मला माहित नाही... पण स्वतःत असणा-या अनेक सूक्ष्म क्षमता एवढंच नाही आपल्यातले अनेक छुपे दुर्गुण या काळात आपल्याला सापडतात. अरेच्चा..आपण असाही विचार करतो हे नव्यानेच उमजंतं अशा वेळेला...
  
     हे सारं स्वीकारून पुढे जायचं की स्वतःलाच कोसत राहायचं...असे दोनच रस्ते असतात आपल्यासमोर... जो निवडाल त्याबरोबर येणारं आयुष्य तुमचं.... एक वाट खाचखळग्याची, अविरत शोधाची पण कोणत्यातरी अज्ञात क्षणी अननुभूत आनंद देणारी...आणि दुसरी...सोपी, सुरक्षित वाटणारी पण तितकंच पांगंळं करणारी... निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला आहे.. पण त्याबरोबरच्या परिणामांचं नाही... म्हणूनच.. ती निवडीची वेळ आणि योग्य़ निवड ओळखता यायला हवी... स्वतःला न ओरबाडता, न कोसता समोर बघता यायला हवं... आणि आपल्या मनातले ते आपणआपल्याला कोणत्याही क्षणी भेटू या ओढीने चालत राहायला हवं... शून्यापासून ते मी पर्यंत...!!
  
      शब्दांच्या जंजाळापेक्षा प्रत्यक्ष प्रवास कठीण असला तरीही... हे शब्दच एखाद्या निराधार क्षणी आधार देऊन जातात...पुढे चालण्याची...कोशातून बाहेर पडण्याची... म्हणूनच हा सगळा शब्दप्रपंच...!!!

       No one can help you better than yourself…All the Best..!! :) :)

Tuesday, January 17, 2012

सगळ्यात सुंदर माणसं...!!


  एखादी व्यक्ती सगळ्यांत सुंदर कधी दिसते ? माझं आपलं साधं सरळ उत्तर आहे. आपलं कोणतंही काम मनापासून करताना...

  तुम्ही कुठल्याही मुलाला अगदी रंगून जाऊन ( स्वतःचे हात-पाय, कपडे यांच्यासकट :P ) चित्रं काढताना बघितलंय... किंवा एखाद्याला मजेत एकटंच शीळ घालत चालताना...(हल्ली हे दृश्य दुर्मिळ असतं तरीही), किंवा एखादा गायक सतारीवर मैफिलीच्या आरंभीचे सूर लावताना... नसेल बघितलं तर नक्की बघा. कारण ही आणि अशी माणसंच जगातली सगळ्यांत सुंदर माणसं असतात. कारण समोरचं काम मनापासून आणि प्रामाणिकपणे केल्यामुळे येणारी एक आगळीच झळाळी असते ती...

आपल्याकडे अगदी फार पूर्वीपासून सौंदर्याचे निकष हे गोरेपणावर, आखीव-रेखीव चेहेरेपट्टींवर अवलंबून होते आणि अजूनही आहेत. त्यामुळे आपल्याकडे असणार्या सौंदर्याबद्दलच्या त्याच त्या चाकोरीबद्ध निकषांबद्दल फार हसू येतं. कारण आंतरिक सौंदर्य असाही काही प्रकार असतो याचा विचारच करत नाही आपण. हल्ली असंख्य सौंदर्यप्रसाधनांच्या जाळ्यात नको तेवढं गुरफटवून घेऊन फक्त त्यांतच आपलं सौंदर्य शोधणार्या माणसांचं फार आश्चर्य वाटतं कधीकधी. (आजच्या युगात प्रेझेंटेबल राहण्यासाठी नीटनेटकं राहणं गरजेचं आहेच.) पण त्याहीपेक्षा आपल्या चेहेर्यावरचा आत्मविश्वास, मनापासून येणारं हसू खूप काही सांगून जातं. छाप पाडतं. 

  असं एकदम मनापासून आतून फुलून येणारं जे जे असतं ते ते सगळं सुंदर असतं... कारण त्यांत कोणताही अभिनिवेश नसतो, आव नसतो. ते फक्त प्रामाणिक व्यक्त करणं असतं. आणि म्हणूनच कोणी अगदी आतून खळखळून हसलं की, स्वतःला विसरून काही करत असलं की, एखाद्या कठीण प्रसंगात ताठ मानेने कणा सांभाळत लढत असलं की.... अशी माणसं खरंच एका वेगळ्याच तजेल्याने नटलेली असतात. अशावेळी त्यांच्या डोळ्यांत उजळणार्या आनंदाच्या लक्ष लक्ष ज्योती आपल्याला खर्या सौंदर्याची प्रचीती देतात. जे बावनकशी सोन्यासारखं कसं झळझळीत असतं.... कारण... कारण ते अगदी मनाच्या कोपर्यातून अलवारपणे पण तितक्याच उत्कटपणे आलेलं असतं.

  अशा लावण्याला वय नसतं. उलट हे असं सौंदर्य तर वयाबरोबर आणखीनच वाढत जातं. कारण त्यांत परिपक्वताही असते.

  असं नैसर्गिक लावण्य कुठे आढळत नाही...? एखाद्या छोट्या बच्चूला हवं असणारं चॉकोलेट मिळाल्यावर त्याच्या निरागस हसण्यात... लिहिताना तंद्री लागलेल्या माणसाच्या चेहेर्यावर..., एखादा अवघड गड जिद्दीने पार केल्यावर आनंदाने दिलेल्या आरोळीत... बाकी कशाचीही फिकीर न करता पावसात चिंब भिजण्याचा अनुभव घेणार्यात.... अशा कित्ती कित्ती गोष्टीत हे सौंदर्य लपलेलं असतं... मात्र ते बघण्याची दृष्टी हवी. तर जीवन आणखीन सुंदर बनेल. बघा बरं तुम्हालाही सापडतंय का ते...!!! J J J

Tuesday, July 26, 2011

शब्द जैसे कल्लोळ... !


    'शब्द बापुडे पोकळ वारा' हे शब्द आत्तापर्यंत फक्त ऐकलेले... पण बाकीचे सगळे शब्द जेव्हा न ऐकण्याचा अगदी हट्टच धरून बसतात ना, तेव्हा हे चार शब्द तेवढे आठवत राहतात. एरवी झराझरा कागदावर सांडू पाहणारे आणि लिहिण्याचीही उसंत न देणारे शब्द जेव्हा असा असहकार पुकारतात तेव्हा मात्र खूप खूप राग येतो त्यांचा... कोणीतरी चक्क दगा देतंय आपल्याला असं वाटायला लागतं. आपण मारे मोठ्या आवेशात लिहायला बसतो. आता एवढं लिहून काढायचंच असं म्हणायला जातो आणि गाडीला ब्रेक लागावा तसं काहीसं होतं. एकदम सगळं स्टॉप...

   मग तुम्ही काय वाट्टेल ते करा... आरडाओरडा( म्हणजे मनातल्या मनात. नाहीतर शब्द सुचत नाहीत म्हणून ओरडणार्या माणसांना आपल्याकडे वेडं समजण्याची शक्यता असते म्हणून :P), कागद फाडा, शब्दांच्या नावाने शिव्या घाला (पण त्यासाठी पण शब्द लागतील नाही का...) थोडक्यात काय, तर आपण मनातल्या मनात चरफडल्याशिवाय काहीही करू शकत नाही. त्यांना यायचं तेव्हाच ते येणार, सुचणार... मग ती त्यांची मर्जी... कधी, कुठे, कसं सुचायचं ते... कधी ते एखाद्या समेच्या टिकाणी असे अचूक सुचतात की वाटावं, 'व्वा...क्या बात है.' जणू काही ते आपल्याच अंकित असल्यासारखे वाटावेत इतके जवळ येतात. तर कधी इतके फटकून वागतात की आपण त्यांना किती परके आहोत. कधी नको त्या ठिकाणी आठवून आपली अगदी गोची करतात... त्यांचं काही नक्की नसतं. माणूस बेसावध असताना, आपल्याला हवं तेव्हा शब्द साथीला येतील अशा खोट्या भ्रमात असतानाच ते नेमके गुंगारा देऊन पळून जातात... आपल्याला हतबल करुन...

   कदाचित... कदाचित त्यांच्या या अशा अडनाडी वागण्यातून त्यांना काही सुचवायचं तर नसेल आपल्याला...? प्रतिभा म्हणा किंवा अचूक शब्दसंधान... आपल्याला ते साध्य झालं तरी आपण त्यावर हुकमत गाजवू शकत नाही. मी शब्दांना गुलाम करुन हवं तसं वापरेन असं म्हणणार्यांच्या तर ते जवळपासही फिरकत नाहीत. कितीतरी 'मी मी 'म्हणणारे इथे तोंडघशी पडतात. शब्दांचीही आराधना, साधना करावी लागते. संगीतात जसा रियाझ लागतो तसा शब्हांचाही रियाझ करावा लागतो. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंत तर ते चक्क रुसून बसतात, हुलकावण्या देतात. त्यांच्याशी मैत्रीच करावी लागते.... तरच ते 'शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे' अशी अनुभूती देतात...  

Monday, June 20, 2011

एक धडपड... कुंपणापलीकडे जाण्याची...


    कुठलंही छोटं युद्ध असो वा महायुद्ध... त्याचे परिणाम हे सरतेशेवटी विध्वंसकच असतात. जीवितहानी होते ती होतेच. पण मनस्थितीची, लोकांच्या भावविश्वाची मोडतोड होऊन जिवंतपणीही मरणयातना भोगायला लागाव्यात इतके हे युद्धाचे-महायुद्धाचे परिणाम भीषण असतात. दुसरं महायुद्ध... हेही अवघ्या जगासाठी असंच उध्वस्त करणारं ठरलं. आपण त्या काळात नव्हतो तरी त्यावेळच्या गोष्टी ऐकूनही आपल्या अंगावर काटा येईल. 'हे सगळं असं का?' असा अनुत्तरित प्रश्न तेव्हाच्या जनतेला पडावा आणि त्यावर विचारही करता येऊ नये इतकं डोकं सुन्न व्हावं अशी परिस्थिती तेव्हा होती. असाच काहीसा प्रश्न नऊ वर्षांच्या, जर्मनीच्या राजधानीत, बर्लिनमध्ये राहणार्या छोट्या ब्रूनोलाही पडतो. तिथूनच, ' द बॉय इन द स्ट्राइप्ड पायजमाज्' या जॉन बायेन यांनी लिहिलेल्या आणि मुक्ता देशपांडे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाची सुरूवात होते.

     शाळेतून घरी आल्यावर अचानक आपल्या घरातल्या सामानाची आवराआवर चाललेली पाहून ब्रूनोला पडणारे प्रश्न, आपलं बर्लिनमधलं सुखवस्तू आणि (ब्रूनोच्या मते) भरपूर संशोधन करता येईल असं घर सोडून जाताना अचानक स्थलांतर कराव्या लागणार्या लोकांना काय वाटत असेल याची कल्पना येते. लहानग्या निरागस ब्रूनोसाठी तर हे सगळं गोंधळात टाकणारंच असतं. नव्या घरच्या कोंदट वातावरणात ब्रूनो अगदी उबून जातो. पण... पण एक दिवस घराच्या खिडकीतून कुंपणापलीकडे त्याला विचित्र दिसणार्या, कैद्यांसारखे एकसारखे कपडे घातलेल्या, खाली मान घालून चाललेल्या लोकांचा घोळका दिसतो आणि ब्रूनोच्या इवल्याशा डोक्यात असंख्य प्रश्नांचे मोहोळ उमटतात. त्याचं कुतूहल चाळवतं. मग सुरू होते एक धडपड... कुंपणापलीकडे जाण्याची...

    ही धडपड करत असतानाच एकाकी ब्रूनोला भेटणारा, कुंपणापलीकडच्या 'त्या' लोकांमध्ये राहणार्या, त्याच्याच वयाचा श्म्यूल, त्या दोघांची जमलेली गट्टी यांतून गोष्ट पुढे सरकत राहते. या सगळ्यांत एक दिवस मात्र वेगळाच उगवतो... श्म्यूलचे हरवलेले बाबा शोधण्यासाठी ब्रूनो मित्राने दिलेले रेघारेघांचे कैद्यांचे कपडे घालून कुंपणाच्या अगदी छोट्याशा फटीतून पलीकडे पाऊल टाकतो मात्र... त्यानंतर पुढे ब्रूनोचं काय होतं हे कळून घेण्यासाठी पुस्तकच वाचायला हवं.

    संपूर्ण पुस्तकात, अधूनमधून होणारा हिटलरच्या उल्लेखामुळे महायुद्धाचा विषय आणखीनच गडद होऊन मनावर ठसतो. तसेच, पुस्तक वाचताना लेखकाने छोट्या छोट्या गोष्टींमधून ब्रूनोच्या भावविश्वात होणारी उलथापालथ चित्रित केलेली जाणवते. ‘‘ब्रूनोच्या पोटात एक कळ उठली. आतमध्ये, अगदी खोल मोठी खळबळ माजली आहे, हे त्याला जाणवलं... हे जे चाललं आहे ; त्याचे परिणाम भविष्यकाळात कुणाला ना कुणाला भोगावे लागणार आहेत हे जगाला मोठ्याने ओरडून सांगावसं त्याला तीव्रतेने वाटलं.’’ या वाक्यांतूनच आपल्याला ब्रूनोच्या मनस्थितीची कल्पना येते. पण ब्रूनोची ही मनस्थिती फक्त त्याच्यापुरतीच मर्यादित नाही. तर ही महायुद्धाचे परिणाम विनाकारण भोगणार्या प्रत्येक माणसाच्या मनोवस्थेचं प्रतिनिधित्व करते. आणि पुस्तक वाचून संपल्यावर 'हे सगळं असं का?' हा लहानग्या ब्रूनोला पडलेला आणि कधीच उत्तर न मिळालेला प्रश्न आपल्यालाही छळत राहतो...
                                              

Wednesday, May 11, 2011

गर्भस्थ...!!


    
     नुकतंच एका छोट्या बाळाला बघून आले. कसं मस्त शांत पहुडलं होतं त्याच्या आईच्या कुशीत.... सध्या तरी जगाशी फक्त श्वासापुरता संबंध असलेलं ते बाळ... खूप हेवा वाटला त्याचा...
    
     आपल्यालाही असं पुन्हा गर्भस्थ होता आलं तर... किती बरं होईल... पळपुटेपणा म्हणून नाही, पण खरंच कधीकधी असं व्हावंसं वाटतं खरं... म्हणजे त्या इवल्या बाळापर्यंत येणारे सगळे आघात आई कशी थोपवते, तसं आपलंही कोणीतरी असावं असं फार फार वाटतं...
    
     कशी एकदम अनटच्ड् आणि अनप्लग्ड् असतात ही बाळं. जगातल्या कसल्याही भावनेचा अजूनपर्यंत स्पर्श न झालेली... तिथे असते ती केवळ शुद्ध निरागसता... बाकी कसल्याही भावनांचा लेप नसलेली... निर्लेप!
     
     अज्ञानात सुख असतं असं म्हणतात. लहान बाळही अजाणच असतं की... आजूबाजूच्या सगळ्या परिस्थितीबद्दल... म्हणूनच का ती इतकी निरागस असतात? फारच बालिश प्रश्न वाटतोय का? पण बघा ना तुम्हीही विचार करून... नाही वाटत तुम्हाला असं कधी की कोणीतरी येऊन मायेने लहान बाळासारखं थोपटावं आणि आपण मुटकुळं करून पडून राहावं... बाकी सगळ्या जगाचा विसर पडावा आणि आपण आपल्याच निरागसतेच्या कोशात लपेटून घ्यावं स्वतःला...
     
     जगातला पहिला श्वास घेताना आणि त्यानंतर संपूर्ण जगाला सामोरं जाताना जी झुंज द्यावी लागते त्याचं बळ या अशा गर्भस्थ अवस्थेतूनच मिळत असतं बहुतेक... म्हणूनच एकदा तरी जाणतेपणाने अनुभवावी... अशी गर्भस्थ अवस्था...!!

Monday, May 9, 2011

लहानपणी जाणवलेली आई....


    तीचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे कळण्याचं ते वय नव्हतं... ती थोडा काळ जरी नसली तरी आपलं काय होईल याचा विचारही कधी केला नव्हता... पण तरी शाळेतल्या अजाण वयातही तिच्यावरच्या प्रेमापोटी केलेली ही अल्लड, बालिश कविता...मातृदिनाच्या निमित्ताने...!!!



आई ही आई असते
ती खरी किंवा खोटी नसते

चिमण्या पिल्लाला सांभाळायला
ती सदैव दक्ष असते

आई म्हणजे समईतली ज्योत
 अखंड प्रेमाचा झोत
 अडलेल्याचा हात
 तर एकाकीपणाची साथ

आई असते आभाळ
जन्मदात्री धरती
तोच सुखी होईल
ज्याला कळेल तिची महती

आ म्हणजे आत्मा
 ई म्हणजे ईश्वर
सप्तसुरांच्या लयीतला हा एकच अनोखा स्वर
जो कधीही लोप पावत नाही,
सतत कानात किणकिणत राहतो,
           देवळातल्या घंटेसारखा....!


 तिचं अस्तित्व सतत जाणवत राहतं

 सुगंध सतत दरवळत राहतो
 नुकत्याच उमललेल्या,
           मोगर्याच्या फुलासारखा....!
                                                        
                     

Related Posts Plugin for WordPress, Blogger...