Friday, January 7, 2011

मिती....निर्मिती...!

असं म्हणतात की मनात काहीतरी अस्वस्थ असं घडायला लागल्यावर कलानिर्मिती होते. त्या क्षणी त्या कलावंताला जाणीवही नसेल कदाचित की आपल्या हातून काहीतरी निर्मित होणार आहे याची... कधीकधी आपली अस्वस्थता घालवण्यासाठी तो स्वतःचं मन आपल्या आवडीच्या कामात गुंतवतो आणि त्यातूनच कलेचं रोपटं तरारून उठतं. 
        आपण एखादी अजोड कलाकृती पाहतो तेव्हा त्यापाठी असलेली कलावंताची प्रतिभा थक्क करणारी असते. मनात सतत प्रश्न पडत राहतो की कसं सुचलं असेल एवढं ? खांडेकरांच 'ययाती' वाचताना, एखाद्या गाण्याची अप्रतिम धून ऐकताना, एखाद चित्र पाहताना , नृत्याच्या पदान्यासावर बोटाला ठीरकावणारा तबला ऐकताना वाटतं, हे सगळं येतं कुठून ? अज्ञात उर्मीमुळे ? मग तिलाच प्रतिभा म्हणत असावेत का ? कधीकधी वाटत की हे जे जे निर्माण होतं ते अमुर्तात कुठेतरी असतं, पण त्याला मूर्त स्वरूप प्राप्त न झाल्याने आपण ते नाहीच असं म्हणतो. पण ते असतं. अव्यक्त स्वरुपात असतं असं म्हणूया हवं तर... विज्ञान म्हणतं की उर्जा ही निसर्गतःच असते, ती नष्ट करता येत नाही किंवा आपण ती निर्माण केली असाही म्हणून शकत नाही.... कारण, आपण ती एका रूपातून दुसऱ्या रुपात रुपांतरित करत असतो. ती जशी निसर्गदत्त आहे, अमूर्त आहे तसाच काहीसं कलेचं ही असावं. हं , पण ती अमुर्तातली कला मूर्त स्वरुपात आणण्याचं कौशल्याचं काम कलावंत करत असतो. जसा शिल्पकार दगडातून  मूर्ती साकार करतो. असं म्हणतात की एखाद्या दगडात ती मूर्ती असतेच. पण ती साकार करण्यासाठी लागणारी दृष्टी, कसब त्या शिल्पकाराकडे असतं. म्हणूनच तर तो प्रतिभावान ठरतो. 
        आता प्रतिभावंत कलावंत सोडले तर आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी एखादी गोष्ट 'मी केली' असं थोडासा का होईना पण अहंकार असतो. पण जे सगळं घडतं ते घडवण्यासाठी आपण एक निमित्तमात्र असतो. हे एकदा कळलं ना की तिथे मीपणा कुठला आणि अहंकार कुठला? खऱ्या प्रतिभावान कलावंतांना हे बहुधा कळलेलं असावं. म्हणूनच ते इतके अलिप्त आणि निरहंकारी असतात....आपल्यालाही यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे.

3 comments:

  1. सामान्य लोकांना न दिसणारी "चौथी" मीती सिध्दि प्राप्त झालेल्यांना दिसते असं म्हणतात. माझ्या मते आपल्या कलेवर जीवापाड प्रेम करणारा एखादा मनस्वी कलाकार एखाद्या सिध्दि प्राप्त झालेल्या योगी पुरुषापेक्षा कमी नसतो. योगी पुरुषांनी त्या चौथ्या मितीमधील गोष्ट सामान्यांना दाखवली कि त्याला "चमत्कार" म्हणतात, तिच कलाकाराने दाखवली कि त्याला "कलाकृती" म्हणतात. :-)

    ReplyDelete
  2. बरोबर आहे.:)या चौथ्या मितीची दृष्टी असण्यासाठी तेवढी 'निसर्गदत्त' देणगी असावी लागते हेही तितकंच खरंय.

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...