
शाळेतून घरी आल्यावर अचानक आपल्या घरातल्या सामानाची आवराआवर चाललेली पाहून ब्रूनोला पडणारे प्रश्न, आपलं बर्लिनमधलं सुखवस्तू आणि (ब्रूनोच्या मते) भरपूर संशोधन करता येईल असं घर सोडून जाताना अचानक स्थलांतर कराव्या लागणार्या लोकांना काय वाटत असेल याची कल्पना येते. लहानग्या निरागस ब्रूनोसाठी तर हे सगळं गोंधळात टाकणारंच असतं. नव्या घरच्या कोंदट वातावरणात ब्रूनो अगदी उबून जातो. पण... पण एक दिवस घराच्या खिडकीतून कुंपणापलीकडे त्याला विचित्र दिसणार्या, कैद्यांसारखे एकसारखे कपडे घातलेल्या, खाली मान घालून चाललेल्या लोकांचा घोळका दिसतो आणि ब्रूनोच्या इवल्याशा डोक्यात असंख्य प्रश्नांचे मोहोळ उमटतात. त्याचं कुतूहल चाळवतं. मग सुरू होते एक धडपड... कुंपणापलीकडे जाण्याची...
ही धडपड करत असतानाच एकाकी ब्रूनोला भेटणारा, कुंपणापलीकडच्या 'त्या' लोकांमध्ये राहणार्या, त्याच्याच वयाचा श्म्यूल, त्या दोघांची जमलेली गट्टी यांतून गोष्ट पुढे सरकत राहते. या सगळ्यांत एक दिवस मात्र वेगळाच उगवतो... श्म्यूलचे हरवलेले बाबा शोधण्यासाठी ब्रूनो मित्राने दिलेले रेघारेघांचे कैद्यांचे कपडे घालून कुंपणाच्या अगदी छोट्याशा फटीतून पलीकडे पाऊल टाकतो मात्र... त्यानंतर पुढे ब्रूनोचं काय होतं हे कळून घेण्यासाठी पुस्तकच वाचायला हवं.
संपूर्ण पुस्तकात, अधूनमधून होणारा हिटलरच्या उल्लेखामुळे महायुद्धाचा विषय आणखीनच गडद होऊन मनावर ठसतो. तसेच, पुस्तक वाचताना लेखकाने छोट्या छोट्या गोष्टींमधून ब्रूनोच्या भावविश्वात होणारी उलथापालथ चित्रित केलेली जाणवते. ‘‘ब्रूनोच्या पोटात एक कळ उठली. आतमध्ये, अगदी खोल मोठी खळबळ माजली आहे, हे त्याला जाणवलं... हे जे चाललं आहे ; त्याचे परिणाम भविष्यकाळात कुणाला ना कुणाला भोगावे लागणार आहेत हे जगाला मोठ्याने ओरडून सांगावसं त्याला तीव्रतेने वाटलं.’’ या वाक्यांतूनच आपल्याला ब्रूनोच्या मनस्थितीची कल्पना येते. पण ब्रूनोची ही मनस्थिती फक्त त्याच्यापुरतीच मर्यादित नाही. तर ही महायुद्धाचे परिणाम विनाकारण भोगणार्या प्रत्येक माणसाच्या मनोवस्थेचं प्रतिनिधित्व करते. आणि पुस्तक वाचून संपल्यावर ‘'हे सगळं असं का?' हा लहानग्या ब्रूनोला पडलेला आणि कधीच उत्तर न मिळालेला प्रश्न आपल्यालाही छळत राहतो...
No comments:
Post a Comment