Friday, January 28, 2011

अश्रू


  मन कातर होणं म्हणजे काय हे ते ‘’ कातर ‘’ झाल्यावरच कळतं खरं तर... कुठेतरी काहीतरी चुकतंय, बिनसलंय याची जाणीव व्हायला लागते, आकाशात काळे ढग दाटावेत तसा आवंढा दाटून येतो आणि डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागतात... अगदी विमुक्तपणे...! त्या वेळच्या क्षणाला नाव नसंतं. पण तो अनामिक क्षण आपल्या मनात कायमचा घर करुन बसतो. मनातला सगळा भर हलका करणार्या त्या वेळच्या त्या अश्रूंना काय उपमा द्यायची हे कळत नाही. पण त्या विशिष्ट क्षणापुरता तरी तो आपल्या अस्वस्थतेवरचा उतारा असतो आणि आपण अगदी अतीव एकटे असू तेव्हाचा सोबतीही...
   '' आमच्या डोळ्यात आत्तापर्यंत पाण्याचा एक टिपूस नाही आलेला. अजूनही येत नाही आणि कधी येणारही नाही.'' असं म्हणणारं कोणी भेटलं की खरंच आश्चर्य वाटतं. मागून राहून राहून एकच शंका मनात डोकावत राहते; ही माणसं मनातल्या मनात तरी कधी रडत असतील का? '' आपल्याकडे रडणं किंवा डोळ्यात पाणी येणं हे सहसा कमकुवत असल्याचं लक्षण मानलं जातं. (पुरुषांच्या बाबतीत तर फारच) पण '' अश्रू '' हे संवेदनांचं उत्तम लक्षण आहे. हो, अगदी वैद्यकीय परिभाषेतसुद्धा... मग ते व्यक्त करताना कमीपणा कसला ?
   ते कढत पाणी गालावरून ओघळायला लागल्यावर आत कुठेतरी हळूहळू घट्ट बांधले गेलेले आपण मोकळे व्हायला लागतो. त्यांच्या तुरट-खारट चवीमागचं कारण काही कळत नाही. पण मनातलं टोचणारं काहीतरी त्याच्याबरोबर वाहून जातंय असं मात्र वाटत राहतं. लहानपणी आई कुठे दिसत नाही म्हणून घाबरून डोळ्यात येणारं पाणी, मोठं होत जाऊ तसं कधीकधी वाटणार्या असुरक्षिततेमुळे डोळ्यात तरारलेलं पाणी, कधी नकळत हळूच डोळ्याच्या काठाशी डोकावणारं पाणी यांतल्या प्रत्येकाला वेगळा अर्थ आहे. त्यांच्यात साम्य असलंच तर हे की हे सगळे सच्चे अश्रू असतात... एकदम सच्चे...! कधी आनंदाने चिंब भिजल्याने येणारे, कधी अनावर दुःखाने येणारे तर कधीकधी असंच मन कातर झाल्याने येणारे...
   सो, जगातलं आपलं बाकी काहीही हरवलं तरी चालेल एक वेळ... पण ‘’ अश्रू ‘’ हरवू देऊ नका... आपल्या जिवंत मनाची एकमेव खूण आहे ती...!!! 
     

Saturday, January 15, 2011

'' वाढ'' दिवस

        '' वाढ '' दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! अशीच वाढत राहा.''  त्या दिवशी मिळालेल्या या शुभेच्छा. दोनच वाक्यात बरंच काही सांगून जाणाऱ्या. माझ्याही नकळत हसू फुटलेलं मला ते वाचताना. जगात पाहिलं निःश्वास घेतल्यापासून क्षणाक्षणाला कणाकणाने वाढत असतो आपण. क्षण , मिनिटं, तास , दिवस , महिने , वर्ष.... काळाच्या या चढत्या परिमाणांबरोबर बदलत असतो. पण ' वाढतो' का?  
        बा. भ. बोरकरांचा संदेश आहे एक... मागे  कधीतरी वाचनात आला होता, '' जगत जा...भरत जा...'' त्या वेळेला चटकन अर्थ  कळला नाही. पण आज त्याचे पैलू उमगायला लागलेयत.  किती प्रगल्भ संदेश दिलाय. जगता जगता भरत जाण्याचा.... जाणीवेने, अभिरुचीने, विचारांनी आणि मनाच्या तरलतेनेसुद्धा...! 
       
        आपल्या  रोजच्या जगण्यात असंख्य गोष्टी घडत असतात. अनुभव, प्रसंग, भेटीगाठी, ओळखी....  यातूनच घडत जातो, समृद्ध होत जातो आपण... आपल्याला ते कधी कधी कळतही नाही. पण अचानक कधीतरी जाणीव होते , '' अरेच्चा ! कुठून शिकलो आपण हे सगळं ? ''  हे समृद्धपण असं सुखद आश्चर्याचा धक्का घेऊन  आपल्या समोर येतं, अगदी अनपेक्षितपणे...! पण त्याचं वेळी दुसऱ्या बाजूला एक रितेपण जाणवत राहत. अजून कित्ती पोकळी भारायचीये आपल्यातली कोण जाणे ? असं वाटत राहतं.  पण हीच तर खरी सुरुवात असते, जगण्याची आणि भरण्याची सुद्धा.... फक्त गरज असते ती टिपकागदी मनाने ' जे जे उत्तम ' ते ते वेचायची. नव्या, जरा आगळ्या दृष्टीने जग बघायची. मनापासून व्यक्त व्हायची. तेव्हाच आपण खरेखुरे ' जगत जातो, भरत जातो ' . बोरकरांनाही कदाचित हेच वाढणं अपेक्षित असावं. 
           ज्या दिवसापासून आपल्या अशा वाढण्याची सुरुवात होईल त्या दिवशी तो आपलं खराखुरा ' वाढ ' दिवस म्हणायला हवा आणि असा दिवस रोजच यावा. :) :) 

Friday, January 7, 2011

मिती....निर्मिती...!

असं म्हणतात की मनात काहीतरी अस्वस्थ असं घडायला लागल्यावर कलानिर्मिती होते. त्या क्षणी त्या कलावंताला जाणीवही नसेल कदाचित की आपल्या हातून काहीतरी निर्मित होणार आहे याची... कधीकधी आपली अस्वस्थता घालवण्यासाठी तो स्वतःचं मन आपल्या आवडीच्या कामात गुंतवतो आणि त्यातूनच कलेचं रोपटं तरारून उठतं. 
        आपण एखादी अजोड कलाकृती पाहतो तेव्हा त्यापाठी असलेली कलावंताची प्रतिभा थक्क करणारी असते. मनात सतत प्रश्न पडत राहतो की कसं सुचलं असेल एवढं ? खांडेकरांच 'ययाती' वाचताना, एखाद्या गाण्याची अप्रतिम धून ऐकताना, एखाद चित्र पाहताना , नृत्याच्या पदान्यासावर बोटाला ठीरकावणारा तबला ऐकताना वाटतं, हे सगळं येतं कुठून ? अज्ञात उर्मीमुळे ? मग तिलाच प्रतिभा म्हणत असावेत का ? कधीकधी वाटत की हे जे जे निर्माण होतं ते अमुर्तात कुठेतरी असतं, पण त्याला मूर्त स्वरूप प्राप्त न झाल्याने आपण ते नाहीच असं म्हणतो. पण ते असतं. अव्यक्त स्वरुपात असतं असं म्हणूया हवं तर... विज्ञान म्हणतं की उर्जा ही निसर्गतःच असते, ती नष्ट करता येत नाही किंवा आपण ती निर्माण केली असाही म्हणून शकत नाही.... कारण, आपण ती एका रूपातून दुसऱ्या रुपात रुपांतरित करत असतो. ती जशी निसर्गदत्त आहे, अमूर्त आहे तसाच काहीसं कलेचं ही असावं. हं , पण ती अमुर्तातली कला मूर्त स्वरुपात आणण्याचं कौशल्याचं काम कलावंत करत असतो. जसा शिल्पकार दगडातून  मूर्ती साकार करतो. असं म्हणतात की एखाद्या दगडात ती मूर्ती असतेच. पण ती साकार करण्यासाठी लागणारी दृष्टी, कसब त्या शिल्पकाराकडे असतं. म्हणूनच तर तो प्रतिभावान ठरतो. 
        आता प्रतिभावंत कलावंत सोडले तर आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी एखादी गोष्ट 'मी केली' असं थोडासा का होईना पण अहंकार असतो. पण जे सगळं घडतं ते घडवण्यासाठी आपण एक निमित्तमात्र असतो. हे एकदा कळलं ना की तिथे मीपणा कुठला आणि अहंकार कुठला? खऱ्या प्रतिभावान कलावंतांना हे बहुधा कळलेलं असावं. म्हणूनच ते इतके अलिप्त आणि निरहंकारी असतात....आपल्यालाही यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे.

Saturday, January 1, 2011

'' आनंदाचं झाड ''



तसं म्हटलं तर , प्रत्येकजण आनंदाच्या शोधात असतो.पु लं नी तर 'मी आनंदयात्री ' असं म्हणूनच ठेवलंय. मुक्त आनंदाची उधळण म्हणजे काय याची प्रचीती त्यांच्यावरून येते. आयुष्यातला कणन कण आनंद वेचीत कसा जगावं हे शिकायचं तर पु लं कडूनच... खरं तर आपल्याही आयुष्यात असे निखळ आनंदाचे क्षण बरेचदा येतात. पण त्या ओळखण्याची दृष्टी हवी. आपल्या रोजच्या कित्येक गोष्टीत निखळ आनंदाचा झरा दडलेला असतो. तो वाहता करणं मात्र आपल्या हातात आहे...
       २०११ च्या नवीन दिवसाची सुरुवात करतानाही अशीच काहीशी भावना आहे. आजपासून छोट्या छोट्या आनंदाच्या रोपट्यांना हळूच गोंजारून त्यांना वाढतं करायचंय.  कधी विचार करून बघितलाय? या आनंदाच्या रोपट्या न्मधूनच 'आनंदाचं झाड ' जन्माला येतं  आणि  त्याची बीजंही  आपल्यातच लपलेली असतात. कुठेतरी वाचलेलं आठवतंय, 'वेदनेतही आनंद असतो.' ऐकताना जरा विचित्र वाटेल कदाचित. पण बाळंतपनाच्या वेणानंतर जन्माला येणारं इवलं इवलं अर्भक पाहिलं की या वाक्याची सत्यता पटते. 
        थोडक्यात काय तर, एक आनंदाचा रेशमी धागा पकडून नवीन वर्षाच्या या पाउलवाटेवरून चालत राहायचं. मग वाटेत कितीही अडथळे येवोत , आपल्या हातातला आनंदाचा गर्भरेशमी वीणेचा धागा आणि मनातला आनंदाचं झाड जोपर्यंत बहरलेलं आहे तोपर्यंत ' कशाला उद्याची बात? '..... :) :) 
         हे मनातला ' आनंदाचं झाड' मनःपूर्वक जपायचं....हाच नव्या वर्षाचा संकल्प...!!!  

Related Posts Plugin for WordPress, Blogger...