Sunday, April 10, 2011

'एक छांदिष्ट अवलिया'


     शाळेत असताना आपण सगळे एक ठरलेला निबंध नेहमी लिहायचो. 'माझा आवडता छंद'... आणि आपल्यापैकी बरेच जण हमखास वाचन हा छंद म्हणून लिहून मोकळे व्हायचे. काही मोजकीच मंडळी अशी असायची की जी आपल्या हटके छंदांबद्दल लिहायची. आज मीही अशाच एका 'छांदिष्ट अवलियाची गोष्ट' सांगणार आहे. त्यांचे छंद विचाराल तर एक काय आहेत? त्यावर एक अख्खं पुस्तक लिहून झालंय त्यांचं...'छंदांविषयी' नावाचं... तरीही अजून त्यांचे छंद त्या पुस्तकात मावणार नाहीत इतके अचाट आहेत. पण त्यांच्या या पुस्तकातून आपल्याला त्यांच्या एक सो एक भन्नाट छंदांची कल्पना येते एवढं मात्र नक्की... आणि म्हणूनच 'मुक्तांगण' सारख्या समाजोपयोगी व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक असणारे डॉ. अनिल अवचट हे आपल्याला त्यांच्या 'छंदांविषयी' या पुस्तकातून 'तो छांदिष्ट अवलिया' म्हणूनही तितकेच भावतात.
    
   खरं तर या पुस्तकाबद्दल एका वाक्यात सांगता येणं तसं कठीणच आहे. पण त्यांना असणार्या निरनिराळ्या छंदांविषयी, एखादा छंद कसा जोपासला गेला आणि त्यातून जोडली गेलेली माणसं या सार्या गोष्टींविषयीचं त्यांचं दिलखुलास मनोगत म्हणजे हे पुस्तक. पुस्तकामध्ये चित्रकला, स्वयंपाक, ओरिगामी, फोटोग्राफी, लाकडातील शिल्पकाम, बासरीचा नाद, वाचनवेड अशा सात छंदांविषयी त्यांनी विस्तृत लिहिलं आहे. तर बाकीच्या छंदांविषयीही त्यांनी थोडक्यात सांगितलं आहे. एकाच व्यक्तीला एवढे सगळे छंद असू शकतात आणि ती व्यक्ती त्या सगळ्या गोष्टींमध्ये कुशल असू शकते हे वाचूनच आपण थक्क होतो.
   
   एवढंच नाही तर, आपल्याला भेटणार्या प्रत्येक व्यक्तीत काही ना काही कलागुण असतातच. ते हेरून त्या व्यक्तीकडून ते कलागुण शिकण्याच्या प्रत्येक पायरीवर मिळणारा निर्भेळ आनंद, त्यामुळे जोडली गेलेली असंख्य माणसं... हे सगळं आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं. त्यातल्या प्रत्येक छंदाचं स्वतःचं असं खास वैशिष्ट्य त्यांचं पुस्तक वाचताना आपल्याला जाणवतं आणि मग छंदांच्या एका निराळ्याच दुनियेत आपण प्रवेश करतो.
   
    अनिल अवचटांच्याच भाषेत सांगायचं झालं तर, डोक्यात काहीतरी छंद असलेल्या माणसाचं मन काही वेगळंच असतं. त्याला वाटतं जे करावं, तेच तो करत राहतो. अशा एखाद्या नव्या गोष्टीकडे लक्ष वेधले जाते आणि आपण त्याच्या मागे लागतो. तो शिकण्याचा काळ मला फार रम्य वाटतो. अशा शब्दात अनिल अवचट आपली छंदांविषयीची भूमिका स्पष्ट करताना दिसतात.
    
    मोर, झाडे, डोंगर अशा एकेका विषयावर दोन दोन महिने मनमुक्तपणे चित्र काढणारे, निरनिराळे खाद्यपदार्थ स्वतः शिकून घेऊन ते हौशीने सगळ्यांना खाऊ घालणारे, हातातल्या कागदांशी खेळता खेळता, ओरिगामीद्वारे बघता बघता लीलया पक्षी- प्राणी तयार करणारे अनिल अवचट आपल्याला इथे भेटतात. फोटोग्राफी करताना माणसांच्या चेहर्यावरचे नैसर्गिक भाव टिपणं त्यांना आवडंतं. तर लाकूड, प्लास्टर ऑफ पॅरिस यामधून शिल्पं कोरून काढण्यातली मजाही ते या पुस्तकात उलगडून दाखवतात. त्यांचा बासरीचा नादही औरच... अगदी दीड वीत लांबीच्या छोट्या बासर्यांपासून ते अडीच-तील फुटी बासर्यांपर्यंत अनेक सुरेल बासर्या त्यांच्याजवळ आहेत. त्या बासरीच्या छंदांबद्दल वाचताना आपल्यालाही तो छंद जोपासावा अशी उर्मी आल्यावाचून राहात नाही. या छंदांशिवाय कोडी उलगडण्यापासून ते जादूचे प्रयोग करण्यापर्यंत असे कितीतरी छंद त्यांना आहेत ते वेगळेच आणि ती यादी न संपणारी आहे...
    
     आपल्या आयुष्यात छंद किती आनंद निर्माण करू शकतात याची जाणीव आपल्याला हे पुस्तक वाचताना होते. म्हणूनच, आवर्जून वाचावं असं हे पुस्तक, छंदांविषयी...!
                                                                                                                                  

Saturday, April 9, 2011

झपूर्झा...


 
     जेव्हा काहीच सुचत नाहीसं होतं....
आणि खोल, आत कुठेतरी काहीतरी चालू असतं....
    तेव्हाच निर्मितीचे क्षण जवळ आलेले असतात....
कारण, आत काहीतरी उमलू पाहात असतं....

प्रत्येक वेळी ते शब्दबद्ध नाही करता येत
  काहीवेळा निसटून जातं....
मुठीत धरलेल्या वाळूसारखं...

पण कधी कधी...
रात्रीच्या गर्भातून एकदम प्रकाश फुटावा
तसं काहीसं होतं....
एरवी ओंजळीत न सापडणारे शब्द
झराझरा कागदावर सांगत राहतात....
मनसोक्तपणे....

एका विलक्षण धुंदीत शब्द उमलत राहतात....
   प्रतिभेची तार झंकारली जाते....
आणि 'तंद्री' ते 'झपूर्झा' असा,
   अज्ञाताचा प्रवास चालू होतो....
निःशब्दपणे...
पण तितक्याच उत्कटपणे...!!
                       - रश्मी.

Wednesday, April 6, 2011

कलंदर


      बाकीच्यांचं माहीत नाही...पण माझ्यामते उत्कट जगणं हीसुद्धा एक कला आहे, खुबी आहे. काही माणसं अशी मुळातूनच भरभरून जगतात की त्यांचं जीवनचरित्र वाचणं किंवा त्यांना प्रत्यक्ष जगताना बघणं ही एक आनंदाची पर्वणी असते. प्रत्येक क्षण सघन जगणं यांना कसं काय जमतं बुवा...


त्यातली काही असतात कलंदर...
जीवन स्वच्छंदी जगण्यासाठीच आहे असं मानणारे...उन्मुक्त फुलपाखरासारखे...!
काही असतात, जीवनालाच आव्हान देणारे... वाईट गोष्टींचा विचारही नाही... फक्त आला काळ मनस्वीपणे जगायचं माहित...
     
अशी माणसंच संजीवनी देऊन जातात... सहवासात येणार्या 
प्रत्येकाला आशेचा एक किरण दाखवून...
 कितीही संकटं आली तरी यांची प्रसन्नता लोप पावत नाही.                                                              

जबरदस्त इच्छाशक्ती आणि विजिगिषू वृत्तीच यांना तारते.
आश्चर्याने थक्क होऊन थकायची वेळ येते...
आनंदाची छोटी छोटी बीजंच पेरतात बहुतेक ती...
आपली छोटी-मोठी दुःखं आत ठेवून चेहर्यावर निर्व्याज हसू कसं काय आणतात? हा एक मोठ्ठा प्रश्न आहे मला पडलेला...!
पण ते हसू जादुई असतं खरं...
कारण...? कारण...
त्यांचा जीवनाबद्दल एक निश्चित विचार असतो. मिळालेल्या आयुष्यावर नितांत प्रेम करतच जगत असतात अशी माणसं... अवघ्या सृष्टीतल्या मांगल्याविषयीचा त्यांचा विश्वास दृढ असतो....आणि...
त्यांनाच आयुष्याचं खरं मोल कळलेलं असतं...
                                    - रश्मी.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...