'' वाढ '' दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! अशीच वाढत राहा.'' त्या दिवशी मिळालेल्या या शुभेच्छा. दोनच वाक्यात बरंच काही सांगून जाणाऱ्या. माझ्याही नकळत हसू फुटलेलं मला ते वाचताना. जगात पाहिलं निःश्वास घेतल्यापासून क्षणाक्षणाला कणाकणाने वाढत असतो आपण. क्षण , मिनिटं, तास , दिवस , महिने , वर्ष.... काळाच्या या चढत्या परिमाणांबरोबर बदलत असतो. पण ' वाढतो' का? आपल्या रोजच्या जगण्यात असंख्य गोष्टी घडत असतात. अनुभव, प्रसंग, भेटीगाठी, ओळखी.... यातूनच घडत जातो, समृद्ध होत जातो आपण... आपल्याला ते कधी कधी कळतही नाही. पण अचानक कधीतरी जाणीव होते , '' अरेच्चा ! कुठून शिकलो आपण हे सगळं ? '' हे समृद्धपण असं सुखद आश्चर्याचा धक्का घेऊन आपल्या समोर येतं, अगदी अनपेक्षितपणे...! पण त्याचं वेळी दुसऱ्या बाजूला एक रितेपण जाणवत राहत. अजून कित्ती पोकळी भारायचीये आपल्यातली कोण जाणे ? असं वाटत राहतं. पण हीच तर खरी सुरुवात असते, जगण्याची आणि भरण्याची सुद्धा.... फक्त गरज असते ती टिपकागदी मनाने ' जे जे उत्तम ' ते ते वेचायची. नव्या, जरा आगळ्या दृष्टीने जग बघायची. मनापासून व्यक्त व्हायची. तेव्हाच आपण खरेखुरे ' जगत जातो, भरत जातो ' . बोरकरांनाही कदाचित हेच वाढणं अपेक्षित असावं.
ज्या दिवसापासून आपल्या अशा वाढण्याची सुरुवात होईल त्या दिवशी तो आपलं खराखुरा ' वाढ ' दिवस म्हणायला हवा आणि असा दिवस रोजच यावा. :) :)

No comments:
Post a Comment