Thursday, May 5, 2011

तेल नावाचा इतिहास...


     साधारण १८५५ च्या आसपासची गोष्ट... हा काळ संपूर्ण जगासाठी निर्णायक ठरेल अशी सुतराम शक्यता त्या वेळी तरी कोणाला वाटण्याचं कारण नव्हतं. तिकडे अमेरिकेतल्या पेनसिल्वेनिया राज्यात दगडांमधल्या भेगांमधून एक प्रकारचा तेलकट, चिकट आणि उग्र वासाचा द्रव निघतो काय आणि पेटती काडी त्या द्रवात बुडल्यावर न विझता जळत राहते काय.... सारं काही अजबच... पण हाच 'पेट्रोलियम' नावाचा अजब-गजब पदार्थ आजही अख्खं जग चालवतोय. एवढंच नाही तर जगातलं राजकारण बदलण्याची, उलथंपालथं करण्याची ताकद या पदार्थात आहे. अशा या सर्वांच्या तोंडचं पाणी पळवणार्या ज्वालाग्राही पदार्थाची गिरीश कुबेर यांच्यासारख्या चतुरस्त्र पत्रकाराने लिहिलेली रंगतदार कथा ''हा तेल नावाचा इतिहास आहे!...'' या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते.
    
      त्या काळात हे असं दगडांमधून तेल झिरपायला लागल्यावर ते खणून काढण्याचा सपाटा सुरू झाला आणि जगातल्या तेलपर्वाची सुरूवात झाली. ती कशी झाली, तेलाची पहिली जगप्रसिद्ध 'स्टॅण्डर्ड ऑईल' कंपनी आणि त्यातून मग निरनिराळ्या कंपन्या कशा निर्माण झाल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात सापडतात. तसंच, सौदी अरेबिया, इराक, इराण यांसारख्या तेलाचा मुबलक साठा असलेल्या अरबी देशांचा या तेलकारणातला सहभाग याविषयी हे पुस्तक भाष्य करतं. एवढंच नाही तर त्या काळापासून ते आजतागायत या तेलाच्या साठ्यावरच सगळ्या देशांचं राजकारण चालत आलंय. कोणाकडे किती तेलसाठे आहेत आणि कुठल्या देशाच्या कंपनीला सर्वांत जास्त तेलाचा व्यापार करण्याची संधी मिळते या गोष्टींभोवतीच आजचा जगाचा कारभार फिरतोय. आपल्याला कल्पनाही आली नव्हती आणि येणार नाही इतकं या तेलाचं महत्त्व आज जगभर आहे. इतकं की 'वसुंधरेचं रक्त' असा या तेलाचा उल्लेख केला जातो. जगाचा भूगोल या तेलाने बदलला, इतिहास घडवला. तो इतिहास रक्तरंजित आहे, युद्धमय आहे, राजकीय आहे आणि लष्करीही... कारण वरवर पाहता पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाची कारणं वेगळी असली तरी त्या सगळ्याच्या मुळाशी हे तेलच होतं. या तेलाचं संरक्षण करता यावं आणि ते तेलसाठे इतर देशांच्या हाती लागू नयेत म्हणून जे डावपेच आखले गेले या सगळ्याचा इतिहास केवळ अफलातून आहे.
    
      मुख्य म्हणजे हा सगळा इतिहास लेखकाने रोचक आणि रंजक करून सांगितला आहे. त्यामुळे हे पुस्तक तेलखपाच्या आकडेवारींनी आणि तेलभावाच्या कोटीमध्ये असलेल्या आकड्यांनी भरलेलं असलं तरी कुठेही कंटाळवाणं होत नाही. याऊलट, फक्त तेलाविषयीच नव्हे तर आपल्याला माहित नसलेल्या इतरही अनेक इंटरेस्टिंग गोष्टी हे पुस्तक आपल्याला सांगून जातं. उदाहरणार्थ, जगातल्या पहिल्या मोठ्या तेलकंपनीचे जनक असलेल्या रॉकफेलर यांची त्या काळची संपत्ती ही आजच्या जगात सर्वांत श्रीमंत ठरलेल्या बिल गेटस् च्या दुप्पट होती. तेही १९१० साली..., तर नोबेल पारितोषिकाची परंपरा कशी सुरू झाली याचा किस्साही वाचावा असाच आहे. नोबेल पारितोषिकाचा उद्गाता असलेल्या आल्फ्रेड नोबेलला अजून दोन भाऊ होते. त्यातल्या लुडविग या तेलव्यापारात काम करणार्या एका भावाचं निधन झालं. त्यावेळी, वृत्तपत्रांनी चुकून आल्फ्रेड नोबेल गेल्याचं छापलं आणि त्याच्यावर मृत्युलेख लिहिताना त्याच्या संशोधनावर टीकेची झोड उठविली. त्यावेळी मनाच्या उद्विग्न अवस्थेत आल्फ्रेड नोबेलने आपलं मृत्युपत्र पुन्हा नव्याने बदललं आणि,’’ माझ्या संपत्तीचा उपयोग विज्ञानक्षेत्रात भरीव कामगिरी करणार्यांच्या गौरवासाठी करा’’ असं लिहून ठेवलं. तेव्हापासून जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिकाची सुरूवात झाली.
     
     तसंच, दुसर्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेची लुसिटानिया ही आलिशान प्रवासी बोट जर्मनीच्या यू-बोट म्हणून ओळखल्या जाणार्या पाणबुड्यांनी बुडविली. या पाणबुड्यांनी अनेक तेलवाहू जहाजं बुडविली होती. त्यामुळे, सगळ्याच देशांना या जर्मन पाणबुड्यांची दहशत बसली होती. हा सगळा इतिहास हे पुस्तक आपल्यासमोर जिवंत करतं. तर पर्ल हार्बरवरचा चित्तथरारक हल्ला आपल्याला ऐकून माहित आहे. तो हल्ला, त्याच्यापूर्वीची आणि त्यानंतरची परिस्थिती याचं वर्णन अशा आपल्याला माहित नसलेल्या कितीतरी गोष्टी आणि त्याचबरोबर, आपल्या ‘’मुंबई हाय’’च्या आणि ओएनजीसीच्या जन्माची कथाही यांत वाचायला मिळते.  
      
     अशा या बहुरूपी, बहुगुणी तेलाला फार मोठा विस्तृत इतिहास आहे आणि तितकंच महत्त्वही आहे. ते महत्त्व किती आणि कसं, हेच तेल जगातल्या पटावरची प्यादी कशी हलवतं आणि शेअरबाजारापासून ते निरनिराळ्या करारांपर्यंत सगळ्या गोष्टी काबीज कशा करतं हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.

1 comment:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...