Tuesday, July 26, 2011

शब्द जैसे कल्लोळ... !


    'शब्द बापुडे पोकळ वारा' हे शब्द आत्तापर्यंत फक्त ऐकलेले... पण बाकीचे सगळे शब्द जेव्हा न ऐकण्याचा अगदी हट्टच धरून बसतात ना, तेव्हा हे चार शब्द तेवढे आठवत राहतात. एरवी झराझरा कागदावर सांडू पाहणारे आणि लिहिण्याचीही उसंत न देणारे शब्द जेव्हा असा असहकार पुकारतात तेव्हा मात्र खूप खूप राग येतो त्यांचा... कोणीतरी चक्क दगा देतंय आपल्याला असं वाटायला लागतं. आपण मारे मोठ्या आवेशात लिहायला बसतो. आता एवढं लिहून काढायचंच असं म्हणायला जातो आणि गाडीला ब्रेक लागावा तसं काहीसं होतं. एकदम सगळं स्टॉप...

   मग तुम्ही काय वाट्टेल ते करा... आरडाओरडा( म्हणजे मनातल्या मनात. नाहीतर शब्द सुचत नाहीत म्हणून ओरडणार्या माणसांना आपल्याकडे वेडं समजण्याची शक्यता असते म्हणून :P), कागद फाडा, शब्दांच्या नावाने शिव्या घाला (पण त्यासाठी पण शब्द लागतील नाही का...) थोडक्यात काय, तर आपण मनातल्या मनात चरफडल्याशिवाय काहीही करू शकत नाही. त्यांना यायचं तेव्हाच ते येणार, सुचणार... मग ती त्यांची मर्जी... कधी, कुठे, कसं सुचायचं ते... कधी ते एखाद्या समेच्या टिकाणी असे अचूक सुचतात की वाटावं, 'व्वा...क्या बात है.' जणू काही ते आपल्याच अंकित असल्यासारखे वाटावेत इतके जवळ येतात. तर कधी इतके फटकून वागतात की आपण त्यांना किती परके आहोत. कधी नको त्या ठिकाणी आठवून आपली अगदी गोची करतात... त्यांचं काही नक्की नसतं. माणूस बेसावध असताना, आपल्याला हवं तेव्हा शब्द साथीला येतील अशा खोट्या भ्रमात असतानाच ते नेमके गुंगारा देऊन पळून जातात... आपल्याला हतबल करुन...

   कदाचित... कदाचित त्यांच्या या अशा अडनाडी वागण्यातून त्यांना काही सुचवायचं तर नसेल आपल्याला...? प्रतिभा म्हणा किंवा अचूक शब्दसंधान... आपल्याला ते साध्य झालं तरी आपण त्यावर हुकमत गाजवू शकत नाही. मी शब्दांना गुलाम करुन हवं तसं वापरेन असं म्हणणार्यांच्या तर ते जवळपासही फिरकत नाहीत. कितीतरी 'मी मी 'म्हणणारे इथे तोंडघशी पडतात. शब्दांचीही आराधना, साधना करावी लागते. संगीतात जसा रियाझ लागतो तसा शब्हांचाही रियाझ करावा लागतो. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंत तर ते चक्क रुसून बसतात, हुलकावण्या देतात. त्यांच्याशी मैत्रीच करावी लागते.... तरच ते 'शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे' अशी अनुभूती देतात...  
Related Posts Plugin for WordPress, Blogger...