Tuesday, March 29, 2011

'लंपनची गोष्ट'


वनवास- प्र.ना.संत
    काही मुलं निसर्गतःच खूप तरल असतात. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींमध्ये घडणारे बदल ती अगदी सहज टिपतात. वरवर इतर मुलांसारखीच सामान्य वाटणारी ही मुलं आतून खरंच खूप अंतर्मुखही असतात. एवढ्या लहान वयातही प्रत्येक गोष्टीवर आपले विचार व्यक्त करण्याची क्षमता त्यांच्यात असते, भले मग ते विचार बाकीच्यांना बालिश वाटू देत... आणि त्यामुळेच ती वेगळी ठरतात. प्रकाश नारायण संत (प्र.ना.संत) यांच्या 'वनवास' या पुस्तकातून आपल्याला भेटणारा लंपन (कोणासाठी लंप्या तर कधी लंपू) पण असाच आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरच्या एका छोट्याशा गावात आपल्या आज्जी-आजोबांबरोबर राहणारा हा शाळकरी मुलगा जितका तरल...तितकाच तीव्र संवेदनाशील...
त्याचं मन एवढं 'टिपकागदी' आहे की त्याला छोट्या छोट्या गोष्टीतही काहीतरी वेगळं सापडतंच. म्हणजे आता उन्हाचा पिटुकला कवडसा...पण तोही त्याला सूर्याचा हात वाटायला लागतो. आजूबाजूच्या प्रत्येक इटुक-पिटुक गोष्टींचं खास त्याच्या अशा 'बेष्ट' स्टाईलमधे वर्णन करणं हे लंप्याचं कामच मुळी...!  त्याची हीच खास स्टाईल आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते.
   अगदी त्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर, ‘’आमचं म्हणजे सगळं एकदम मॅडसारखंच...  म्हणजे आंम्हाला नेहमी मॅडसारखं काहीतरी वाटतं. बेष्टपैकी काहीतरी आवडतं. आम्ही आपले सारखे आजोबांना, बाबांना एकशेसत्तावीस  का काय वेळा ते प्रश्न विचारत राहतो. आंम्हाला दहा बारा तासांऐवजी खरं तर एकोणीस-तास झोपायचं असंतं... पण झोपच येत नाई. वाईट वाटलं, रडायला आलं की आमचा घसाच दुखायला लागतो.’’ अशा लहान-सहान गोष्टी सांगून तो पुस्तकातून आपली ओळख पटवत राहतो.
सुमी म्हणजे त्याची पेट्ट मैत्रीण. त्याच्या बोलण्याची ढब पण भन्नाटच. पाहुणे आले की 'कोण की' आलेत म्हणून स्वारी मोकळी होते. '' असं काहीतरी झालं की आमचं जे काही होतं, ते होतं.'' असं म्हणून तो आपली होणारी पंचाईत पण तो सांगून टाकतो.
      त्याचे प्रत्येक गोष्टीवरचे विचार म्हणजे अफलातूनच... '' चॉकलेटच्या रंगीत वड्या कागदात गुंडाळलेल्या असतात. तशी ही मॅड पोरं कोणत्यातरी वासामध्ये गुंडाळलेली.'' असं आपल्या शाळेतल्या मुलांविषयी त्याला वाटतं. तर शाळेत असताना '' तेवढ्याच भागातल्या त्या उन्हात उभी असलेली पोरं आणि पोरी सोन्याचा वर्ख लावलेली दिसत होती. त्यांच्या अंगावरून नुसतं बोट फिरवलं तरी त्याला तो सोनेरी रंग लागेल असं काहीतरी मला मॅडसारखं वाटायला लागलं.'' असंही तो म्हणतो. यांतूनच आपल्याला त्याची तरल संवेदना आणि अचाट, भन्नाट कल्पनाशक्ती कळते.
     सुमीची आणि त्याची दोस्ती एकदम जगावेगळीच.. त्यांच्यातली घट्ट पण खट्याळ मैत्री..., मधूनच सुमीच्या डोळ्यात त्याला जाणवणारी, दिसणारी रंगीत पिसं, सुमी आजूबाजूला असल्यावर आणि नसल्यावरही त्याला तिच्याबद्दल जाणवणारी अस्पष्टशी गोड, अनामिक हुरहुर हे सगळं...सगळं लंपनच्याच शब्दांत वाचताना आपण आपल्याही नकळत त्याच्या विश्वात गुंतत जातो.
     लंपूच्या आजूबाजूची, वंटमुरीकर देसायांचा लठ्ठ बोका, तांबुळवाडकर आजी, एशी, केबी, चंब्या, कणबर्गी गंग्या, टुकण्या अशी अतरंगी नावं असलेले त्याचे मित्र ही मंडळीही गोष्टीत मस्त रंगत आणतात. मग आपल्यालाही त्या गोष्टीत असल्यासारखं वाटायला लागतं... त्याच्या घरासमोरून जाणारा 'गुंडीमठ' रोडही खरं तर त्याचा मित्र. '' त्याला पण आपल्यासारखंच एकटं वाटत असणार, नक्की.'' असं तो म्हणताना आपल्याला त्याच्या सजग संवेदना जाणवत राहतात. पुस्तकातल्या त्याच्या निरागस आणि भाबड्या विनोदांवरही आपण तितक्याच मोकळेपणाने हसतो.
     प्र.ना.संत यांनी मोकळ्या-ढाकळ्या, अनौपचारिक शैलीत रंगवलेला हा 'लंपन' म्हणूनच आपल्याला जास्त जवळचा वाटायला लागतो. पुस्तकातल्या गोष्टी अगदी साध्या-सोप्या आणि आपल्या नेहमीच्या आयुष्यात घडणार्या आहेत. पण त्या लंपनच्या शब्दात ऐकताना मात्र त्या गोष्टींमधली खरी गंमत, आनंद कळत जातो. त्यामुळे लंपनच्या वयाच्या अशा संवेदनाशील मुलांचे भन्नाट विचार, त्यांना वाटणार्या अबोल भावना नक्की कशा असतात ? त्यांचा अल्लडपणा, हुडपणा, निरागसता, तरलता हे सारं अनुभवण्यासाठी हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचायला हवं.
     'वनवास' प्रमाणेच 'पंखा', 'झुंबर', 'शारदा संगीत' या पुस्तकांतूनही लंपनची गोष्ट चालूच राहते. मात्र त्याच्या जाणीवा-नेणीवा वयाबरोबर बदलत जातात आणि त्याबरोबर एका भावनाशील लंपनची ओळख नव्याने पटत जाते.
     म्हणूनच, पुस्तक वाचून संपलं तरी हा छोटुला, निरागस लंपन मनात कायमचा घर करून राहतो...  
Related Posts Plugin for WordPress, Blogger...